धाराशिव (प्रतिनिधी)- व्यवस्थापन शास्त्र विषयात जगभरात सर्वमान्य, देशातील चौथ्या आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाची नावाजलेली संस्था अशी ख्याती असलेल्या नागपूर 'आयआयएम'कडून जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार केला जाणार आहे. जिल्ह्याचा सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी निश्चित केलेल्या महत्वपूर्ण प्रकल्पात सुसूत्रता येऊन मोठी गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, शाश्वत सिंचन व्यवस्था, उद्योगनिर्मिती आणि पर्यटन व्यवसायाला प्राधान्य दिले जाणार आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांनी सर्वोत्कृष्ट अशी मान्यतेची मोहर उमटविलेल्या नागपूर आयआयएमची जिल्ह्याला मोठी मदत होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आकांक्षीत जिल्ह्याचा विकास ज्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत आहे अगदी त्याचप्रमाणे तो साकारण्यासाठी जिल्ह्याचा एक व्यापक एकात्मिक विकास आराखडा अत्यावश्यक आहे. एकात्मिक विकास आराखड्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून भरीव निधीची उपलब्धता सहज शक्य होणार आहे. जिल्ह्याचा आर्थिक आणि सर्वार्थाने कायापालट करण्यासाठी यापूर्वीच आपण अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना निश्चित केल्या आहेत. त्या सर्व प्रकल्पाचे एकात्मिक पद्धतीने सुनियोजन करणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये, बलस्थाने आणि उपलब्ध मनुष्यबळ या सगळ्या बाबींचा शास्त्रीय पद्धतीने विचार करून हा आराखडा तयार केला जाणार आहे. देशातच नव्हे तर अन्य देशातही व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या नागपूर आयआयएम या विख्यात संस्थेने आपल्या जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यास अनुकूलता दर्शविली असून आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. तयार करण्यात आलेला हा एकात्मिक विकास आराखडा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निती आयोग आणि केंद्र शासनाकडे सादर केला जाणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
आपल्या धाराशिव जिल्ह्याची भौगोलिक आणि नैसर्गिक बलस्थाने लक्षात घेऊन जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून प्राधान्यक्रमासह हा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार तातडीच्या, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांसह जिल्ह्याच्या आर्थिक विकासाकरिता अत्यावश्यक असलेल्या महत्वपूर्ण बाबींचाही या आराखड्यामध्ये समावेश केला जाणार आहे. रोजगार निर्मितीसाठी कौडगाव येथील औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प व सोलार पार्कची निर्मिती, उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व अनुषंगिक मूल्य वृद्धी, आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्ह्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील पाणी, मराठवाडा वॉटर ग्रीड, बंधारे दुरुस्ती, सोलापूर-तुळजापूर- धाराशिव रेल्वेमार्ग जलद गतीने पूर्ण करणे, जिल्ह्यात जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारणे, श्री क्षेत्र तुळजापूरसह जिल्ह्यातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा लक्षवेधी विकास या आणि यासह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा या आराखड्यात समावेश करण्याचा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना एकत्रित करून जिल्ह्याचे मूलभूत वैशिष्ट्य केंद्रबिंदू मानून नागरिकांच्या आकांक्षा लक्षात घेऊन व्यापक सर्वांगीण विकास साध्य करणे हा यामागचा मुख्य हेतु आहे. आत्मनिर्भर भारत सारख्या व्यापक योजनेच्या माध्यमातून उस्मानाबादी शेळीचे संवर्धन व आनुषंगिक मूल्यवृद्धी असा प्रकल्प हाती घेवून त्यातूनही जिल्ह्याचा आर्थिक दृष्ट्या कायापालट होवू शकतो. जिल्ह्याला लाभलेली वर्षभर स्वच्छ सूर्य प्रकाशाची नैसर्गिक देण योग्य पद्धतीने वापरुन मोठ्या प्रमाणात सौर उर्जेवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प उभारणे सहज शक्य होणार आहे.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन या आराखड्याचे प्रारूप तयार करणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ अभ्यासकांसह नागपूरच्या आयआयएमचे मोठे सहकार्य होणार आहे. आदरणीय डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी जिल्ह्याला सिंचन, वीज, रस्ते अश्या मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत एक महत्वाच्या टप्प्यावर आणून ठेवले आहे. त्याला अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी आता आपली असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.
आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत. शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक दर्जाच्या अनेक विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट युनिर्व्हसिटी ऑफ लिले फ्रान्स, वेस्ट मिनिस्टर बिझनेस स्कूल, युनिर्व्हसिटी ऑफ वेस्ट मिनिस्टर इग्लंड, युनिर्व्हसिटी ऑफ मेमफीस, अमेरिका,इन्स्टिट्यूट मांइन्स टेलिकॉम, फ्रॉन्स, कोफेनहेगन बिझनेस स्कुल डेनमार्क, स्कूल ऑफ स्टॅटेजिक मॅनेजमेंट जपान आदी विद्यापींठासोबत आयआयएमचा सामंजस्य करार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन आणि व्यवस्थापनाचे काम इथे सातत्याने सुरू असते. आता आपपया धाराशिव जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा याच जागतिक दर्जाच्या संस्थेच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे.