धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात हरवलेल्या 1276 मोबाईलपैकी 284 मोबाईल धाराशिव पोलिसांना शोधण्यात यश आले आहे. त्यापैकी 18 डिसेंबर रोजी 30 मोबाईल संबंधितांना परत केले आहेत. अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या दुरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या/ चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी सीईआयआर हे ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. सदरचे पोर्टल धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस कार्यन्वित करण्यात आले आहे. फिर्यादी स्वत: आपली मोबाईल हरवल्याची तक्रार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवू शकतात.
धाराशिव जिल्ह्यातील हद्दीमध्ये सन 2023-2024 मध्ये चोरीस गेलेल्या/ हरवलेल्या मोबाईलच्या एकुण 1,276 तक्रारी पोलीसांनी सीईआयआर या पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी एकुण 284 मोबाईल (56,80,431 रूपये किंमतीचे) शोधून काढण्यात धाराशिव पोलीसांना यश आले आहे. त्यापैकी सायबर पोलीस ठाणेने शोधलेले एकुण 30 मोबाईल (6,03,279 रूपये) किंमतीचे हे आज दि. 18 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक संजय जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आले. त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, पोलीस हावलदार कुलकर्णी, हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक पौळ, पोलीस अमंलदार जाधवर,भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली आहे.