धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील 55 वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी हिवाळी अधिवेशनात 13 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. दुरूस्तीअभावी मुख्य कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी वितरण होत नसल्याने साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला फटका सहन करावा लागत आहे. वितरण व्यवस्थेत सुधारणा, अस्तरीकरण आणि बांधकाम दुरूस्तीसाठी 29 कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 13 कोटी 97 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता 10 गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कुरनूर मध्यम प्रकल्पाचा मुख्य कालवा आणि वितरिकेमार्फत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील नळदुर्ग, अणदूर, चिवरी, गुजनूर, खुदावाडी, सराटी, शहापूर, वागदरी आणि बाभळगाव आदी दहा गावांना शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी दिले जाते. दहा गावांतील तीन हजार 643 हेक्टर क्षेत्र या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र प्रकल्पाची वितरण व्यवस्था 55 वर्षे जुनी आहे. आजवर कालव्याचा झालेला वापर, कालव्याची वेळेवर न झालेली दुरूस्ती, अशा अनेक कारणांमुळे पाण्याचा विसर्ग 50 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. कालवा भरावातून, बांधकामातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. सिंचन अवर्तनाचा कालावधीतही त्यामुळे वाढ झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी घट झाल्याचे तसेच अनेक ठिकाणी शेवटच्या टोकाला कालवा बुजविला गेल्याचेही निदर्शनास आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

10 किलोमीटर लांबीच्या मुख्य कालव्यासह 24 किलोमीटर लांबीच्या पाणीवितरण व्यवस्थेच्या कामाचे अस्तरीकरण आणि बांधकाम कामाची निविदा यापूर्वीच 7 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. मागील 55 वर्षांपासून दुरूस्तीअभावी रखडलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या दहा गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी लवकरच उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


 
Top