धाराशिव (प्रतिनिधी)- येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकतेच विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले. या विधी साक्षरता शिबिरासाठी दिवाणी न्यायाधीश वसंत यादव (वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) मुख्य न्यायरक्षक ॲड.अमोल गुंड, ॲड भाग्यश्री रणखांब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, कार्यक्रम समन्वयक डॉ.उषा वडणे , महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष प्रा.सुनीता गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी
दिवाणी न्यायाधीश वसंत यादव मार्गदर्शन करताना म्हणाले की विविध स्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात असून यामध्ये अगदी बालविवाहा पासून ते कुठल्याही महिलेवर लैंगिक अत्याचार किंवा अन्य समस्यांनी त्या ग्रस्त असतील तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला त्या 24 तास केव्हाही फोन करून आपली अडचण ,समस्या सांगून त्या सोडवू शकतात. यामुळे महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास येत असून त्यांनी आपल्या अडचणी निसंकोच पुणे तात्काळ सोडवाव्यात. असेही त्यांनी आवाहन केले. मुख्य न्यायरक्षक ऍड.अमोल गुंड यांनी पोक्सो कायद्याअंतर्गत जे गुन्हे घडतात त्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगून यावरील विविध कायदे आणि त्यावर असलेली उपाययोजना , दंडात्मक कार्यवाही याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . तसेच रॅगिंग प्रतिबंधक कायदे किती कडक आहेत याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती केली. ॲड भाग्यश्री रणखांब यांनी कार्यालयीन क्षेत्रांमध्ये महिलांचा होत असलेला लैंगिक छळ याविषयी विस्तृत माहिती देऊन ,चुकूनही कोणी अशा कचाट्यात सापडत असेल तर त्यांनी त्वरित याविषयी सजग राहून गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी कायद्याचा वापर केला पाहिजे, याविषयी सविस्तर अशी माहिती दिली. हे समजून सांगताना त्यांनी देशात घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख केला.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की, आमच्या महाविद्यालयामध्ये पूर्वीपासूनच महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत महिलांना, मुलींना वेळोवेळी कायद्याविषयी सज्ज करण्यासाठी आम्ही शिबिरे आयोजित करतो .जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने राबविलेला हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून निश्चितपणे सर्व महाविद्यालयाला याचा फायदा होत असल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले .कार्यक्रम समन्वयक डॉ.उषा वडणे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कायदेविषयक सजग असणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. शेवटी महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्ष प्रा. सुनीता गुंजाळ यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमासाठी फर्स्ट इयर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड विमल म्हेत्रे यांनी केले.