धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात मी विधानसभेत व रस्त्यावर देखील आवाज उठवणार असल्याचा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील विविध ठिकाणी सभा घेत आपल्या निवडणूक प्रचाराला जोर दिला आहे.

 या सभांमध्ये आमदार पाटील यांनी मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ठाम आणि स्पष्ट भूमिका मांडली. ज्यामुळे या समुदायांच्या प्रश्नांकडे ते संवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार पाटील म्हणाले की, माझी भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे. मुस्लिम, धनगर आणि मराठा या तिन्ही समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, आणि मी या समुदायांसोबत एक सेवक म्हणून उभा आहे. त्यांनी तिन्ही समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शवली असून, या समाजांना संवैधानिक मार्गाने आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

आमदार पाटील यांच्या या विधानानंतर मतदारसंघातील मुस्लिम, धनगर आणि मराठा समाजातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे. पाटील यांच्या मते, या तिन्ही समाजांच्या मागण्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, आणि निवडून आल्यानंतर ते हा विषय अधिक तीव्रतेने मांडतील, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. आमदार पाटील यांच्या सभेत मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. मतदारांशी संवाद साधताना त्यांनी महविकास आघाडीच्या धोरणांचे फायदे आणि समाजाच्या उन्नतीसाठी आघाडीच्या सरकारने केलेल्या कामांचे मुद्दे सादर केले.

 
Top