धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरी, मारामारी आदी संदर्भात 42 गुन्हे दाखल असलेल्या सुंभा (ता. धाराशिव) येथील एका आरोपीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून एमपीडीए कायद्याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे.
सुंभा (ता. धाराशिव, ह. मु. काकानगर, धाराशिव) येथील सराईत गुन्हेगार कृष्णा श्रावण शिंदे (25) याने विविध साथीदारांसह धाराशिव, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 42 गुन्हे केले आहेत. यामध्ये चोरी, जबरी चोरी, दरोडा, मारहाण आदी संदर्भातील गुन्ह्यांचा समावेश आहे. साथीदारासह वारंवार वरीलप्रमाणे गुन्हे करून लोकांच्या मालमत्तेस व जीवितास धोका निर्माण करून दहशत पसरवून त्याने एमपीडीए कायद्याचा भंग केला. तसेच सध्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 ची आचारसंहिता चालू असून, त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी त्याला स्थानबध्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला होता. प्रस्तावास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची मंजुरी मिळाल्याने पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, बेंबळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, बेंबळी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक ज्ञानदेव गुरव यांच्या पथकाने त्याला हर्सुल कारागृहात स्थानबध्द केले.