भूम (प्रतिनिधी)-  कमी रकमेचा सौदा करून तीन एकर जमीन देण्यास नकार दिल्याने एका ज्येष्ठ व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना भूम तालुक्यातील वालवड नजीक घडली असून, याप्रकरणी बुधवारी सात जणांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक करून न्यायालयात उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील वालवड गावाजवळील खटाळवस्तीवरील रहिवासी अमोल महाजन काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे काका भाऊसाहेब उर्फ भावड्या गुलच्या काळे हे 25 नोव्हेंबर रोजी घरी परतले नव्हते. शोध घेतला असता ते मृतावस्थेत आढळून आले. अंगावरील जखमांवरून त्यांचा दगडांनी, लाकडांनी आणि लोखंडी गजाचा वार करून निर्घृण खून करण्यात आल्याचे दिसत होते. दत्ता मोहिते, औदुंबर मोहिते, दत्ता मोहन शेलार, गौतम बलभीम मोहिते, सुधीर बलभीम खटाळ, सतीश नारायण शेलार व विठ्ठल मोहन शेलार यांनी संगणमत करून भाऊसाहेब काळे यांचा खून केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सातपैकी दत्ता मोहिते व औदुंबर मोहिते वगळता उर्वरीत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती भूम ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत तवार यांनी दिली. या पाच आरोपींना न्यायालयात उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

भाऊसाहेब काळे यांची तीन एकर वडिलोपार्जीत जमीन असून, संबंधित शेत दत्ता मोहिते व औदुंबर मोहिते हे त्यांच्याकडे कमी पैशांमध्ये खरेदी करून दे म्हणून तगादा लावत होते. जमीन विक्री करत नसल्याने व जमिनीतील मुरूमही काढल्याने भाऊसाहेब काळे यांनी विचारणा केली होती. त्यावरून जिवे मारण्याची धमकीही दिली होती. 

 
Top