कळंब (प्रतिनिधी)- हा बाण बाळासाहेबाचा नाही तर मोदी शहा यांनी चोरलेला बाण आहे. अशा लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या प्रवृत्तीला ठेचुन आपला स्वाभिमानी बाणा दाखवून द्यावा. असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी जनतेला केले. तालुक्यातील खडकी येथे आयोजित सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी थेट भाजप सरकारवर आक्रमक शब्दांत टीका केली.
आ. पाटील म्हणाले, हिंदुत्ववादी म्हणून गळा काढणारे भाजपच हिंदुत्व नकली आहे. अन्यथा यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात त्यांचा पक्ष फोडला नसता, त्यामुळे ज्या चिन्हावर बाळासाहेबाचा निष्ठावंत प्रेम करायच तेच चिन्ह देखील चोरून यांना मताची भीक मागावी लागत आहे. हा बाण बाळासाहेबाचा नाही तर मोदी शहा यांनी चोरलेला आहे. याचा बदला जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत घेतला आहे. पण गद्दारी गाडून पुन्हा एकदा महाविकास आघाडी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरे यांना न्याय मिळणार आहे असे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.
मोठ्या व्यापारी वर्गाला फायदा करून देण्यासाठी भाजप सरकारने सामान्यांच्या जीवनात अडथळे उभे केले आहेत. चॉकलेट, कोका-कोला, पेप्सी यांसारख्या महागड्या वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली, तरी सामान्यांच्या जीवनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पण या वस्तू तयार करणाऱ्या उद्योगपतींना सवलत देण्यासाठी भाजप सरकारने साखरेच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यातूनच हे स्पष्ट होते की, भाजपचे धोरण हे मोठ्या व्यापाऱ्यांना सोयीस्कर आहे. तर दुसरीकडे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शेतकऱ्यांचे हाल आणि भाजपचे अनियंत्रित धोरण
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत भाजपने शेतकरी विरोधी धोरण राबवली आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या खतावर 18% आहे, ज्यामुळे त्यांना वाढीव खर्च सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, हेलिकॉप्टरसारख्या आलिशान वस्तूंवर मात्र 5% लावला जातो. ट्रॅक्टरसारख्या शेतकरी गरजेच्या वस्तूंवर हा कर अधिक असून, भाजप सरकारने शेतकऱ्यांना संपन्न समजून त्यांच्या गरजांना दुर्लक्षित केले आहे.
त्यांनी उद्योगपतींच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर निशाणा साधला, जेव्हा उद्योगपतींच्या 15 लाख कोटी रुपयांच्या कर्ज माफ केल्या जातात, तेव्हा शेतकऱ्यांसाठी मात्र विविध अटी-शर्ती लावून त्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवले जाते. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवत फक्त आपल्याच आर्थिक पायऱ्यांची सोय केली आहे.
लाडकी बहीण' नाही, ही 'लाडकी खुर्ची योजना'
महायुतीच्या 'लाडकी बहिण योजना'वर देखील आ. पाटील यांनी तीव्र शब्दांत टीका केली. लोकसभेत भाजपचा पराभव झाल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावरच ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला ‘लाडकी बहीण' असे नाव दिले असले तरी ही योजना लाडक्या खुर्चीसाठी तयार करण्यात आली आहे. भाजपने जनतेच्या मतांचा अनादर करत सत्ता गुवाहाटीमार्गे घेतली आणि आता निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतांसाठी महिला मतदारांना भुलविण्याचे पाऊल उचलले आहे. असे आ. पाटील यांनी सांगितले.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस, तेल, जीवनावश्यक वस्तूचे दर प्रचंड वाढलेले असताना भाजप सरकारच्या 'लाडकी बहीण योजने'तून काहीही लाभ होणार नाही. योजना केवळ मतांसाठीचा एक पोकळ गाजावाजा आहे, ज्यातून सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.