धाराशिव (प्रतिनिधी)- मी गद्दारीत सोबत आलो नाही म्हणून माझ्यावर राग होता, तो राग माझ्यावर काढायचा होता. पण या लोकांनी सामान्य जनतेला वेठीस धरून शहरातील कामे होऊ दिली नाहीत. तुमचा हेतू जनता आमच्या विरोधात जाईल. पण जनतेला सत्य माहित असून ते योग्य निर्णय घेऊन अश्या प्रवृत्तीला कायमचे हद्दपार करेल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला. धाराशिव शहरातील नेहरू चौक व जिजाऊ चौक याठिकाणी आयोजित सभेत ते बोलत होते. 

ते म्हणाले मंजूर कामे रद्द करणे,महत्वाच्या रस्ते कामास स्थगिती देणे, निधी असून तो खर्च न करता मुद्दाम काम रखडवली हे केल्यानं शहर वासियांना भोगाव्या लागलेल्या यातना जनता लक्षात ठेवून तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचे संदर्भ देत सत्ताधारी सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी मतदारांना आश्वस्त केले की, महाविकास आघाडी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास प्रलंबित कामे पूर्ण करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील.

आ. पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात धाराशिवसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडा संकुल, रस्ते, उद्याने, तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. त्यांनी हे कामे मार्गी लावण्यासाठी मोठा पाठपुरावा केला होता, मात्र सत्तांतरानंतर या सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली, असे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली कामे सध्याच्या सरकारने जाणीवपूर्वक स्थगित केल्याचा आरोप आ. पाटील यांनी केला. “सत्तेचा गैरवापर करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात आहे. राजकीय वैमनस्यामुळे धाराशिव शहराचा विकास रोखला गेला आहे,” असे ते म्हणाले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या विकासाला गती दिली होती, असा दावा करत आ. पाटील यांनी शिवसेनेच्या कार्याची स्तुती केली. शिवसेना ही जनतेच्या हक्कासाठी लढणारी आणि प्रामाणिक नेतृत्व असलेली पक्ष संघटना आहे. असे त्यांनी ठामपणे सांगितले. आ. पाटील यांनी पुढील काळात धाराशिवसाठी विकासाच्या नव्या योजना राबविण्याचे वचन दिले. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, या निवडणुकीत योग्य निर्णय घेऊन प्रामाणिक नेतृत्वाला संधी द्या. आपल्या शहराचा विकास प्राधान्याने पूर्ण केला जाईल.

 
Top