धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी आयोजित सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली. सत्तांतरामुळे शहराच्या विकास कामांवर आलेल्या अडथळ्यांचा जाब विचारा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.
आ. कैलास पाटील यांनी त्यांच्या भाषणात धाराशिव शहरातील जिजामाता उद्यान, संभाजी महाराज उद्यान आणि गांधीनगर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान या तीन प्रमुख उद्यानांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सात कोटी रुपये मंजूर केल्याचे सांगितले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, या कामांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर आणि गद्दारांबरोबर मी सामील झालो नाही यामुळे विरोधकांनी या कामांना स्थगिती देऊन काही काळानंतर ती रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला. याचे पुरावे म्हणून कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचे त्यांनी जाहीर केले.
सभेत आ. पाटील यांनी 59 डीपी रस्त्याच्या 140 कोटींच्या प्रकल्पावरूनही सरकारला लक्ष्य केले. या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला होता, त्याची निविदा प्रक्रिया 29 मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होती. मात्र, आज (17 नोव्हेंबर 2024) पर्यंत ती निविदा उघडण्यात आलेली नाही. राज्य सरकारला या प्रकल्पाच्या उशीरामागचे गणित समजावून सांगावे लागेल. यासाठी कोण जबाबदार आहे, याचे उत्तर त्यांनी धाराशिवच्या जनतेला द्यावे,असे आ.पाटील यांनी ठणकावून सांगितले.
आ. पाटील यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या कपातीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, शहरातील कंत्राटदारांची बिले थकली आहेत, त्यामुळे अनेक विकास कामे अडून पडली आहेत. यावरून हे सरकार विकास कामांसाठी किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
महापालिकेच्या लाईट व्यवस्थापनावर टीका करताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने गुजरातच्या एका कंपनीसोबत करार केला आहे. या करारानुसार, आपल्या महापालिकेला लाईट बदलण्याचा अधिकारही उरलेला नाही. सर्व कामे संबंधित कंपनीकडूनच केली जात आहेत. एवढेच नव्हे, तर अनोफचे बटनही त्यांनी काढून नेले आहे. या व्यवस्थेमुळे स्थानिक स्वायत्त संस्थांचे अधिकार कमी झाले आहेत.
सभेत आ. कैलास पाटील यांनी धाराशिवच्या जनतेसाठी विकास कामांसाठी वचनबद्ध असल्याचे पुन्हा सांगितले. शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर आहे. विरोधक केवळ जनतेला भूलथापा देत आहेत, परंतु मी विकासाच्या पुराव्यांसह बोलतो, असे ते म्हणाले.
धाराशिवमध्ये झालेल्या या सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आ. कैलास पाटील यांच्या या स्पष्टवक्तेपणाने आणि विकासावरील ठाम भूमिकेमुळे उपस्थित नागरिकांमध्ये ऊर्जा संचारली. या सभेत त्यांनी विरोधकांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत शहराच्या विकासाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले. धाराशिव विधानसभा निवडणुकीतील ही सभा मतदारांवर कितपत प्रभाव पाडेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.