धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या अडीच वर्षात तुळजापूरच्या तिर्थक्षेत्र विकासावर तत्कालीन पालकमंत्री यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे राणाजगजितसिंह पाटील यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद द्यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे अमरराजे परमेश्वर-कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
सोलापूर- तुळजापूर- धाराशिव रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिराचा विस्तार करण्याचे नियोजन करण्याचे निश्चित झाले आहे. पुढील काळात वाराणसी, अयोध्दा या सारखा विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणी अमरराजे कदम यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी म्हणावे असले लक्ष पूर्ण जिल्ह्यावर दिले गेले नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर धाराशिव येथे शिवसेना शिंदे गटाचे योग्य ते सहकार्य न मिळाल्यामुळे अजित पिंगळे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. तर पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेले तानाजी सावंत यांना केवळ दीड हजार मताने विजय मिळवावा लागला. त्यामुळेच शिवसेना शिंदे गटाच्या सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.