धाराशिव (प्रतिनिधी)- उमरगा व धाराशिव शहरात अवैध शस्त्र बाळगलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्याकडील गावठी कट्ठा जप्त करून संबंधित आरोपींविरूध्द उमरगा व धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उमरग्यातून आसिफ आयुब पठाण (24) तर धाराशिवमधून हुसेन पापा शेख (29) यांना अटक करण्यात आली आहे.

उमरगा पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिस निरीक्षक भोसले यांना एकता अपार्टमेंटच्या मागे साई नगरातील आसिफ आयुब पठाण (रा. उमरगा) याचेकडे गावठी कट्टा बेकायदेशीरित्या बाळगल्याचे समजले. पथकाने त्याला ताब्यात घेतल्यावर पल्सरच्या सीटखाली कट्टा सापडला. पथकाने आरोपीसह गावठी कट्टा, एक लोखंडी खाली मॅगझिन व बजाज दुचाकी जप्त करून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. धाराशिव शहर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, पोलिस निरीक्षक शेख यांना धाराशिव येथे गावसूद रोड आरटीओ कार्यालयानजीक सार्वजनिक रोडवर हुसेन पापा शेख (रा. तुळजापूर नाका, धाराशिव) याच्याकडे गावठी कट्टा बेकायदेशीरित्या बाळगल्याचे समजले. पथकाने त्याला ताब्यात घेत गावठी कट्टा जप्त केला. धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भोसले, धाराशिव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेख, पोलिस उपनिरीक्षक संदीप ओव्हळ, पुंजरवाड, उमरगा पोलिस ठाणे व धाराशिव शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

 
Top