धाराशिव (प्रतिनिधी)-  एक शूद्र स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत:च त्याचा शोध घेते, स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले ज्ञानतत्व जनांसाठी मागे ठेवत भागवतधर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. संत सोयराबाई यांचे संपूर्ण जीवन हे स्त्रीमुक्तीच्या दिशेने सुरु झालेला एक प्रवास असून तो समस्त स्त्री वर्गास प्रेरित करत राहते. असे प्रतिपादन डॉ. कविता मुरूमकर यांनी केले. 

धाराशिव येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालय येथील खा. प्रमोद महाजन सभागृहात 'संत सोयराबाई  : व्यक्तित्व आणि कर्तृत्व' या ग्रंथाचे प्रकाशन कवयित्री, समीक्षक, साहित्यिका डॉ. कविताजी मुरूमकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संत साहित्याचे अभ्यासक सचिन पाटील व प्रा. संदीप सांगळे यांनी संपादित केलेल्या  “ संत सोयराबाई  : व्यक्तित्व आणि कर्तृत्व' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या. संत सोयराबाई यांच्या साहित्यकृतीत वेदना अन स्वातंत्र्य या सोबतच उच्च मानवीय मुल्यांचे दर्शन घडते. सातशे वर्षांपूर्वी सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल ‌‘ब्र' काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्नच विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला? यावरूनच सोयराबाई यांच्या असंतोषची जाणीव होते. 

याप्रसंगी शेषाद्री डांगे, अधिवक्ता हभप पांडुरंग महाराज लोमटे महाराज, कमलाताई नलवडे, माजी प्राचार्यां सुलभा देशमुख, प्राचार्य प्रशांत चौधरी, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथील प्रा. महेश्वर कळलावे, रामदास कोळगे, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक व ग्रंथ संपादक सचिन पाटील, प्रा. सोमनाथ लांडगे, ॲड. रोहित मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा तेरकर यांनी केले. तर आभार प्रा. डॉ. सहदेव रसाळ यांनी केले.

 
Top