उमरगा (प्रतिनिधी)- दोन्ही शिवसेनेत उमरगा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत प्रविण स्वामी यांनी विजय मिळवला. प्रविण स्वामी हे एका जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक होते. मुंबई किंवा मातोश्रीवर एकवेळ ही न जाता त्यांना एबी फॉर्म मिळाला आणि ते आमदारही झाले. तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाल्याने तालुक्यातील मंत्रीपदाची संधी हुकल्याचे खंत व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू म्हणून ओळख असलेले ज्ञानराज चौगुले यांना विधानपरिषदेवर घेवून त्यांना मंत्री करावे अशी मागणी करण्यासाठी उमरगा व लोहाच्या तालुक्यातील 100 गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत. 

उमरगा विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. तीनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्ञानराज चौगुले यांची उमेदवारी पहिल्या फेरीत जाहीर झाली आणि त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व गाव भेटीचा सपाटा लावला. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा घोळ आणि समोर सक्षम उमेदवार दिसत नसल्याने ज्ञानराज चौगुले आमदारकीचा चौकार मारणार अशी परिस्थिती होती. चौगुले यांनी प्रचाराची एक फेरी संपली तरीही महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा व उमेदवारीचा घोळ मिटत नव्हता.  महायुतीच्या उमेदवारीसाठी 7 ते 8 इच्छुकांनी मातोश्रीवर फिल्डिंग लावली होती. अनेक मुंबई वा-या केल्या. परंतु खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या शिफारशीनुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ऐनवेळी आयुष्यात मुंबई व मातोश्रीवर न गेलेले एका जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रविण स्वामी यांना एबी फॉर्म दिला. इतर सर्व इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बैठक घेऊन आपले अर्ज मागे घेत आपली सर्व ताकत ज्ञानराज चौगुले यांच्या बाजुने लावली. महायुतीचे सर्व दिग्गज नेते प्रचाराला लागले परंतु हे सर्व नेते ज्ञानराज चौगुले यांचा पराभव थांबवू शकले नाहीत. पहिल्या फेरीत लोहारा तालुक्यातून मिळालेली लीड शेवटपर्यंत कायम राहिली. उमरगा व लोहारा शहरातून ज्ञानराज चौगुले यांना कमी मते मिळाली. 

हॅट्रिकवीर ज्ञानराज चौगुले यांनी मागील अडीच वर्षांत अठराशे कोटींचा निधी आणला. यामध्ये सर्व जाती धर्माला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. ज्ञानराज चौगुले यांनी पंधरा वर्षांत प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन मतदारसंघात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा तयार केली होती. परंतु कामाची गुत्तेदारी देताना अनेक जुने गुत्तेदार व नवख्या गुत्तेदारांना रोखून केवळ आपल्याच कार्यकर्त्यांना कामाचे वाटप करण्यात आले. यामध्ये एका गावात 10/12 कार्यकर्ते असले तरी केवळ चारच कार्यकर्त्यांना गुत्तेदारी मिळाली. उर्वरीत कार्यकर्ते अंतरले आणि हे गुत्तेदार कार्यकर्ते वाढून गुत्तेदारीत हिस्सा पडणार नाही याची खबरदारी घेत होते. चौगुले हे महायुतीचे होते. परंतु अनेक गावांतील शिवसैनिकांनी फाजील आत्मविश्वासामुळे मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही. 

चौगुले यांना मंत्रिपद मिळण्याची आशा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी चौगुले यांना मंत्रिपद देण्यात यावे अशा घोषणा दिल्यानंतर शिंदे यांनी तुम्ही 20 नोव्हेंबरला ज्ञानराजच्या डोक्यावर विजयाचा दिवा लावा मी लाल दिवा देतो अशी घोषणा केली होती. संपूर्ण राज्यात महायुतीची त्सुनामी आली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमुळे सत्तेची स्वप्न पडणा-या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता होण्यापुरतेही आमदार निवडून आणता आले नाहीत. मात्र उमरगा विधानसभा मतदारसंघात मात्र लाडकी बहीण ही चौगुले यांना तारु शकली नाही. गावागावांतील अंतर्गत गटबाजी यामुळे चौगुले पराभूत झाले आहेत. तीन टर्म आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाल्याने तालुक्यातील मंत्रीपदाची संधी हुकल्याचे खंत व्यक्त केली जात आहे. एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू म्हणून ओळख असलेले ज्ञानराज चौगुले यांना राज्यपाल नियुक्त किंवा विधानसभा सदस्यातून घ्या पण ज्ञानराज चौगुले यांना विधानपरिषदेवर घेवून त्यांना मंत्री करावे अशी मागणी करण्यासाठी उमरगा व लोहाच्या तालुक्यातील 100 गाड्या घेऊन शिवसैनिक मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत.


 
Top