धाराशिव (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून विधानसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी चालू झाली होती. सर्व मतदारसंघातील नेते मंडळींनी गावागावातील गाव पुढाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. निवडणुकीत चांगलाच रंग भरला असून, प्रत्येक उमेदवार मलाच मतदान द्या अशी विनंती करत असले तरी मतदारांनी कोणाला मतदान करायचे हे ठरले आहे. सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी चारही विधानसभा मतदारसंघात विविध उमेदवारांनी पदयात्रा काढून जाहीर प्रचाराची सांगता केली. 

धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटील विरूध्द शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात प्रमुख लढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पिंगळे यांनी धाराशिव शहरातून मोटार सायकल रॅली काढून प्रचाराची सांगता केली. तर आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद मतदारसंघात कळंब येथे भव्य रॅली काढून सभेने प्रचाराची सांगता केली. 

तर परंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत विरूध्द शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. प्रा. सावंत व मोटे यांनी भूम शहरात भव्य पदयात्रा काढली. तर तुळजापूर येथे भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील विरूध्द काँग्रेसचे ॲड. धिरज पाटील यांच्या प्रमुख लढत होत आहे. तुळजापूर शहरात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धिरज पाटील यांनी पदयात्रा काढून मतदारांना आवाहन केले. उमरगा शहरात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले विरूध्द शिवसेना ठाकरे गटाचे प्रविण स्वामी यांच्या प्रमुख लढत होत आहे. उमरगा शहरात चौगुले व स्वामी यांनी भव्य पदयात्रा काढून प्रचाराची सांगता केली. 

प्रचारातील प्रमुख मुद्दे

या निवडणुकीत अडीच- अडीच वर्षाच्या कारभाराची तुलना करून मतदारांना माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महायुतीच्यावतीने जिल्ह्यात करण्यात आलेली विकास कामे, त्याच प्रमाणे लाडकी बहीण आदी योजनेची माहिती देवून मतदारांना आवाहन केले. तर महाविकास आघाडीच्यावतीने महागाई, शेतीमध्ये कमालीचे अस्थैर्य, लहरी निसर्ग, चुकीची सरकारी धोरणे, ढासळत चाललेले बाजारभाव, कायदा व सुव्यवस्था आदी मुद्दे समोर ठेवून मतदारांना आवाहन करण्यात आले. 

 
Top