धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता किती मंत्रिपदे जिल्ह्याच्या पदरात पडणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. जिल्ह्यातून भाजपचा चेहरा असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील, यापूर्वी पालकमंत्री असलेले प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची प्रबळ दावेदारी असणार आहे. त्यांच्यासोबत आता सलग चार वेळा शिक्षक आमदार असलेले व्रिकम काळेही शर्यतीत आहेत. सध्या तिघांनाही पश्रश्रेष्ठींनी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळणार का तीन याची चर्चा चालू आहे.

परंडा मतदारसंघातून प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा निसटता विजय झाला. राज्यस्तरीय नेते म्हणून त्यांची प्रतिमा असताना ते विशेष करिश्मा दाखवू शकले नाहीत. असे असले तरी त्यांची पुन्हा मंत्रीपदासाठी दावेदारी असणार आहे. दुसरीकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरातून एकहाती विजय मिळवला. त्यांनी आपली स्वच्छ प्रतिमा, विकासाची दूरदृष्टी असलेला नेता म्हणून प्रभाव, संयमी व्यक्तीमत्व म्हणून त्यांना चांगला फायदा झाला. गतवेळी 26 हजार मतांनी विजयी झाले होते. यावेळी मात्र त्यांनी 36 हजारापेक्षा अधिक मते घेत विजय मिळवला. तसेच ते भाजपचे जिल्ह्यातील सलग दुसऱ्या वेळचे एकमेव आमदार आहेत. 

राष्ट्रवादीला जिल्ह्यातील एक तरी जागा सोडावी, अशी येथील कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र वाटाघाटीत जागा मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मात्र बाहेरून उमेदवार आयात करून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पक्षात नाराजी होती. त्यावेळी उमेदवारीचे दावेदार असलेले सुरेश बिराजदार यांना विधान परिषदेत घेण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिली होते. परंतु ते आश्वासन न पाळल्यामुळे जिल्ह्यात नाराजी आहे. यामुळे चार वेळा शिक्षक आमदार असलेले विक्रम काळे यांना मंत्रीपद मिळण्यासाठी कार्यकर्त्यांकडून मागणी करण्यात येत आहे. 

 
Top