नळदुर्ग (प्रतिनिधी)-  चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्याची दुदैवी घटना नळदुर्ग येथे दि. 5 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पत्नीची हत्त्या केल्यानंतर पतीने स्वतावरही शस्त्राने वार करुन घेतल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर सोलापुर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने नळदुर्ग शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की नळदुर्ग येथील घरकुल मध्ये अब्दुल वहीद बिलाल कुरेशी वय 45 व त्यांची पत्नी सुलताना अब्दुल वहीद कुरेशी वय 40 हे आपल्या मुलांसह राहतात. कुटुंबाच्या उपजिवेकेसाठी घरकुल शेजारी असणाऱ्या नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांनी चहाची टपरी लावली होती. गेल्या अनेक दिवसांपासुन त्यांची चहाची टपरी याठिकाणी आहे.

अब्दुल वहीद बिलाल कुरेशी हा आपली पत्नी सुलताना अब्दुल वहीद कुरेशी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती. दि. 5 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्यांची चहाची टपरी सुरु होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या नवरा - बायकोमध्ये भांडण सुरु झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की,संतप्त झालेल्या अब्दुल वहीद बिलाल कुरेशी याने त्याची पत्नी सुलतानावर कात्री व चाकुने सपासप वार केले. यामध्ये सुलतानाचा जागीच मृत्यु झाला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहुन अब्दुल यानेही स्वतावर वार करून घेतले. यामध्ये तोही गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती तेथील नागरीकांनी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखुन नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर नागरे, साळुंके व पोलिस उपनिरीक्षक गिते हे तात्काळ घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या अब्दुल वहीद बिलाल कुरेशी याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्याला सोलापुर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पत्नी मयत झाली आहे. तर पती गंभीर जखमी होऊन मृत्युच्या दारात उभा आहे. अब्दुल व सुलताना यांना दोन मुले, दोन मुली आहेत.


 
Top