कळंब (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव - कळंब मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील अनेक गावांत सभा घेतल्या. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचार, विकासकामांतील स्थगिती, शेतकऱ्यांवरील अन्याय आणि केंद्राच्या धोरणांवर कठोर टीका केली.

आ. पाटील यांनी महायुती सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आडून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सात महिन्यात कोकणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याचे कारण भ्रष्टाचार आहे. मांजरा नदीवरील बॅरेजेस काम, येडशी-कळंब रोड यासारख्या महत्वाच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली. आम्ही महायुतीसोबत सामील न झाल्याने या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.





पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना फक्त नावापुरत्या असल्याचे सांगत, पिक विमा योजनेवर टीका केली. ते म्हणाले की, पिक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून, ती केवळ कंपन्यांच्या नफ्यासाठी राबवली जात आहे. पंतप्रधानांनी ही योजना स्वत:च्या राज्यात का लागू केली नाही, याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

यावेळी आ. पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या वचनाची आठवण करून दिली. त्यांनी दावा केला की, महाविकास आघाडीच्या काळात कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षांत कर्जमाफी केली नाही, आता निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना धोका न देण्याचे वचन देताना सांगितले की, मोदी-शहांच्या राजकीय प्रयोगानंतर पक्ष फोडला, चिन्ह चोरले तरी मी आपल्या मतदारांचा विश्वास न तोडता एकनिष्ठ राहिलो. माझा वारसा जपण्यासाठी मी कधीच गद्दारी करणार नाही.आगामी निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.


 
Top