धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्रात ज्याप्रमाणे देशाला अपेक्षित असे हक्काचे सरकार आले. अगदी त्याचप्रमाणे राज्यातही महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही. त्यामुळे मतदारांनी महायुतीच्या उमेदवारालाच साथ द्यावी, महाराष्ट्राचा विनाश करू पाहणाऱ्या मविआला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन युवा नेते मल्हार पाटील यांनी केले.
तुळजापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव तालुक्यातील नितळी, सुंभा, येवती येथे सभा, कॉर्नर बैठका घेऊन मल्हार पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आतापर्यंत तुम्ही मोलाची साथ दिली. भविष्यातही असेच मजबूत पाठबळ मिळणे गरजेचे आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. केंद्रात आपल्या हक्काचे सरकार आहे. राज्यात देखील महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्याच्या विकासासाठी निधी खेचून आणण्यासाठी दादांची राजकीय ताकत वाढवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. विकासाचा हा ओघ कायम राहावा व आपल्या गावातही भरघोस विकास निधी आणता यावा, यासाठी महायुतीच्या कमळ या चिन्हाला मतदान करावे, असे आवाहन मल्हार पाटील यांनी केले.