तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा निवडणुकीत एक- एक मतदान खेचण्यासाठी प्रंचड चुरस निर्माण झाल्याने छोट्या समाज घटकांना या निवडणुकीत प्रचंड महत्त्व आले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदार संघाचा प्रचार प्रचंड जोरात सुरु आहे. वैयक्तिक गाठी भेठी, काँर्नर सभा व भव्य रँली या माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे. तुळजापूर विधानसभा निवडणुक दुरुंगी होईल असे वाटत असताना ती तिरंगी होण्याची शक्यता झाली आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 23 उमेदवार रिंगणात आहेत. यातील काही उमेदवार समाज घटकाचा आधार घेत प्रचार करीत आहे. यंदा प्रथमच ही निवडणुक जाती समुहावर जात असल्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा निवडणूकीत ज्याप्रमाणे मराठा विरुध्द ओबीसी वाद पेटला होता. यात फक्त दोन मोठ्या समाज घटकांचा विचार करून आपली राजकिय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न लावला आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणूकीत मतदार संघात मोठ्या संख्येने असलेले समाजातील उपजाती, छोटे समाज घटकच उमेदवारांसाठी विजयाचे दार उघडणार आहेत.
राजकिय नेते, पुढाऱ्यांना निवडणूक आल्या की फक्त तीनच समाज दिसतात.एक मराठा, ओबीसी व अल्पसंख्याक परंतु या समाजातील उपजाती घटक हे संख्येने कमी असल्यामुळे त्यांच्या मतांना महत्व देण्याची तसदी उमेदवार आजपर्यत घेत नव्हते. आता माञ निवडणुकीत प्रचंड चुरस झाल्याने नेत्यांनी उपजाती, छोटे समाज गट याकडे आपला मोर्चा ओळवुन त्यांच्याशी संपर्क साधुन तुमच्या मागण्या सांगा आम्ही विजयी होताच सोडवु असे आश्वासन देत उपजाती, छोटे समाज घटकातील मतदारांना आपल्या कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुळजापूर मतदार संघात मराठा, धनगर, अल्पसंख्याक माळी समाज मोठा आहे. कुणबी, बंजारा, तांबोळी, तेली, वंजारी, गवळी, कलार, गुरव, न्हावी, सोनार, लिंगायत पिंजारी, मोमीन, वैश्य, बागी, भंगी, कुंभार यांची संख्या कमी आहे. हे समाज संख्येने कमी असले तरी सध्या विजयी कोणाला करायचे यासाठी निर्णायक भूमिका असणार आहे.