भूम (प्रतिनिधी)- परांडा विधानसभा मतदार संघातील 21 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. परांडा विधानसभा मतदार संघात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान 69. 83 टक्के मतदान झाले. परांडा विधानसभा मतदार संघात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहचला होता. विद्यमान विधानसभा सदस्य प्रा. डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे,वंचितचे प्रवीण रणबागुल, रासपचे डॉ. राहुल घुले अशी चौरंगी लढत या मतदार संघात रंगली होती.
या मतदार संघात 3 लाख 30 हजार 773 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 75 हजार 321 पुरुष तर 1 लाख 55 हजार 546 स्त्री मतदार आहेत. या मतदार संघात 6 तृतीय पंथी मतदार आहेत. भूम,परांडा,वाशी या तिन्ही तालुक्यात 376 मतदान कक्षाची सुविधा करण्यात आली होती. भूम तालुक्यात 135 मतदान केंद्रावर 65 हजार 399 पुरुष तर 56 हजार 342 एकूण 1 लाख 19 हजार 641 मतदार होते. परांडा तालुक्यात 142 मतदान केंद्रात 65 हजार 751 पुरुष व 58 हजार 92 महिला असे एकूण 1 लाख 23 हजार 847 मतदार होते. वाशी तालुक्यात 99 मतदार केंद्रात 46 हजार 171 पुरुष तर 41 हजार 112 असे एकूण 87 हजार 285 मतदार होते. उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परांडा मतदार संघात मतदानाच्या दिवशी कोठेही काहीही गैरप्रकार घडला नाही.