तुळजापूर (प्रतिनिधी) - 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघात शनिवार दि. 9 व रविवार दि. 10 नोव्हेबर या दोन दिवसात ज्येष्ठ, रुग्ण, दिव्यांग मतदारांच्या घरी जावुन गोपनियतेचा भंग न करता मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात 676 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी तीस पथके कार्यान्वित केली असुन सकाळी 7 ते सांयकाळी 6 वाजे दरम्यान मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यात सर्वाधीक मतदार हे तेर व नळदुर्ग येथे प्रत्येकी वीस-वीस आहेत. यामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व अंथरुणावर खिळुन असलेले रुग्ण, दिव्यांग बांधव यांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
यात या 676 मतदारांच्या प्रत्यक्ष घरी जावुन गोपनियतेता भंग न पावता मतदान घेतले जाणार आहे. यात जास्तीत जास्त पन्नास किलोमीटर अंतरावर जावुन मतदान घेतले जाणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने पुर्ण तयारी केली. यावेळी अधिकारी, फोटोग्राफर, व्हिडिओ ग्राफर, पोलीस कर्मचारी यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तरी राजकिय पक्ष जागरुक नागरिक यांनी या मंडळीचे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी निवडणुक विभागाला सहकार्य करावे असे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी संजय डव्हळे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी केले आहे.