धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामात पहिल्या पंधरवाड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाचे 2500 रुपये प्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी दिली. संबंधित शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शाखेत तसेच ज्या शेतकऱ्यांचे खाते उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत आहे त्या शेतकऱ्यांनी संबंधी बँकेत जाऊन बिल घ्यावे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शाखेत खाते उघडलेले नाही त्यांनी खात्याची नोंद करावी, असे आवाहनही चेअरमन श्री.पाटील यांनी केले आहे.
धाराशिव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन गतवर्षी जागजी शिवारात नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याची उभारणी केली. चाचणी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस प्रथम गळीत हंगामात कारखान्याला दिला आहे. चाचणी गळीत हंगामात सर्वाधिक दर देण्याची घोषणा चेअरमन श्री.पाटील यांनी केली होती. त्या वचनाला जागत जागजीच्या एनव्हीपी शुगरने गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पंधरा दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची परंपरा प्रथम गळीत हंगामातही जोपासली आहे. त्यानुसार 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे 2500 रुपये प्रमाणे बिल संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. चाचणी गळीत हंगामापेक्षा जास्त प्रतिसाद प्रथम गळीत हंगामात मिळाल्यामुळे यंदा सर्वाधिक ऊस गाळप होईल असा विश्वासही चेअरमन नानासाहेब व्यंकटराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.