धाराशिव (प्रतिनिधी)- जनतेच्या मनातील आणि स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुतीने आपले संकल्पपत्र - 2024 जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने प्रमुख संकल्पांपैकी मुलांना मोफत उच्चशिक्षण, निराधारांच्या सन्मान निधी आणि लाडक्या बहिणींच्या आर्थिक लाभात वृध्दी तसेच सरकार स्थापनेनंतर पुढील 100 दिवसांच्या आत ‘व्हिजन महाराष्ट्र-2028' जनतेसमोर सादर करण्यात येणार असल्याची माहिती तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रतिष्ठान भवन येथे सोमवारी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील उपस्थित होते. ते म्हणाले की, महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या आर्थिक लाभाच्या योजनेत महिन्याला पंधराशे रूपये महिलांना मिळत आहेत. त्यात आणखी सहाशे रूपये वाढ करून महिन्याला दोन हजार शंभर रूपये देण्यात येणार आहेत. ज्येष्ठ व निराधार नागरिकांच्या सन्माननिधीमध्ये वाढ करून दरमाह त्यांनाही एकवीसशे रूपये देण्यात येणार आहेत. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थीर ठेवणे, प्रत्येक गावात पाणंद रस्ते, खतांवरील जीएसटी कर शेतकऱ्यांना परत करून सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान सहा हजार रूपये भाव, महिलांना लखपती दीदी बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून फिरता निधी उपलब्ध, कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मोफत अन्नधान्य, प्रत्येक जिल्ह्यात आकांक्षा केंद्र स्थापन करून उद्योजक निर्मिती, ओबीसी, एसबीसी, इडब्ल्यूएस आणि व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परिक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती, किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासकीय रूग्णालयांमध्ये स्वतंत्र तपासणी व उपचार सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ करून जनसेवा, अन्नसुरक्षा आणि हक्काचे घर, शेतकरी सन्मान निधीत वाढ करून वार्षिक 15 हजार आणि एमएसपीवर 20 टक्के अनुदान देण्याचा संकल्प महायुतीने केला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.