धाराशिव (प्रतिनिधी)- 14 नोव्हेंबर “बालदिन” या दिवसाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान बाल कामगार प्रथेविरोधी सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्ताने जिल्ह्यात जिल्हा कार्यक्षेत्रातील बाल कामगार बहूलक्षेत्र निश्चित करणे,जिल्ह्यातील विटभट्टी येथे भेटी देवून तपासणी करणे आणि मालकांकडून, चालकाकडून बालकामगार न ठेवणेबाबतचे हमीपत्र लिहून घेणे, जिल्ह्यातील हॉटेल असोसिएशन यांच्या बैठका घेऊन त्यांना सुधारीत बाल कामगार अधिनियमाबाबत माहिती देणे,जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील व्यापारी संघटनाचे एकत्रित चर्चा सत्र घेणे,बाल कामगार प्रथेविरुद्ध जिल्ह्यातील बाजारपेठ क्षेत्रात रॅली घेणे,सार्वजनिक ठिकाणी बाल कामगार अधिनियमाबाबत जनजागृती करणे,जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना येथे बाल कामगार कामावर न ठेवण्याबाबत स्टीकर, पॉम्प्लेट तयार करुन प्रदर्शित करणे,जिल्ह्यातील औद्यागिक क्षेत्रातील सर्व मालक संघटनांची बैठक घेऊन तेथे बाल कामगार प्रथेविरुद्ध चर्चा करुन जनजागृती करणे आणि त्यांना बालकामगार कामावर ठेवू नये म्हणून सामुदायिक शपथ कार्यक्रम आयोजित करणे आदि कार्यक्रम या सप्ताहादरम्यान घेण्यात येणार आहे.

बालकामगारांशी निगडित काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असलेल्या क्षेत्रामध्ये पालकांचे प्रबोधन करणे, पत्रके वाटणे, वस्तीमधील लोकांना बाल कामगार निर्मुलन कार्यक्रमात सामावून घेणे, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना घरेलू कामगार म्हणून बाल कामगारांना न ठेवण्याबाबत आवाहन करणे,प्रत्येक जिल्हा कार्यालयाने त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना बाल कामगार प्रथेविरुद्ध संवेदनशिल करण्याकरीता कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी. तसेच बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय, प्रकियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे.जर मालकाने, नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास त्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार रुपये ते 50 हजार रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवु नये.असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.     


 
Top