धाराशिव (प्रतिनिधी)- पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उजनी धरणातून 146 कीलोमीटर पाइपलाईनद्वारे थेट सीना नदीपात्रात सोडले जाणार आहे. तुळजाभवानीच्या चरणी रामदरा तलावात कमी वेळेत अधिकाधिक पाणी पोहचावे यासाठी करण्यात आलेली आखणी यशस्वी झाली आहे. सोमवार 7 ऑक्टोबर रोजी या कामासाठी राज्य सरकारने 276 कोटी रुपयांचा कार्यारंभ आदेश दिला आहे. दीर्घकालीन बाबींचा विचार करून घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळे तुळजापूरसह लोहारा आणि उमरगा तालुक्यातील 10,862 हेक्टर क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. मोठ्या कौशल्याने आखलेल्या या योजनेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे यश मिळाले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
मराठवाड्याच्या हक्काचे कृष्णा खोऱ्यातील 23.66 टीएमसी पाणी देण्यास राज्य सरकारची मंजुरी आहे. त्यादृष्टीने सर्व निर्णयही सकारात्मक झाले आहेत. त्यातील टप्पा क्र. 1, 2 आणि 3 अंतर्गत 7 टीएमसी पाण्याची कामे सध्या सुरू आहेत.त्यातील तुळजापूरला येणाऱ्या टप्पा क्र. 2 ची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. उजनी धरणातील पाणी मिरगव्हाण येथील पंप हाऊसमधून थेट सिना कोळेगाव धरणाच्या खाली सिना नदीच्या पात्रात 146 किलोमीटर च्या पाइपलाइनद्वारे सोडले जाणार आहे.
नदीपत्रातून पाण्याला लागणारा वेळ, बाष्पीभवन त्याचबरोबर वेगवेगळ्या मार्गाने होणारा अपव्यय दूर व्हावा, यासाठी हे पाणी मिरगव्हाण पंपगृहातून थेट पाइपलाइनद्वारे सिना नदीपात्रात सोडण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय मंजूर झाला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. घाटणे बॅरेजपासून एकूण सहा टप्प्यात 116 किलोमीटरचे अंतर पार करून आलेले पश्चिम महाराष्ट्रातील 2.24 टीएमसी पाणी डिसेंबरअखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी असलेल्या रामदरा प्रकल्पात पोहोचेल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अपुऱ्या माहितीच्या आधारे अर्धवट ज्ञान असलेले विरोधक केवळ दिशाभूल करण्यात माहीर आहेत. झपाटयाने होत असलेली विकास कामे व यासाठी उपलब्ध होत असलेला निधी यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक वायफळ बडबड केली जात आहे. आपल्या माणसांसाठी काहीतरी ठोस रचनात्मक काम करण्यापेक्षा सुरू असलेल्या कामात अडथळा आणणे ही यांची प्रवृत्ती आहे. अश्या प्रवृत्तीवर बोलून वेळ खर्ची करण्यापेक्षा आपल्या भागासाठी आणखी दोन सकारात्मक कामे करण्याला आपण पूर्वीपासूनच प्राधान्य देत आलो असल्याचेही आ. पाटील म्हणाले.