नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी ओबीसी नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांना जाहीर करण्यात आली आहे. डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या या उमेदवारीमुळे तुळजापुर विधानसभा मतदार संघातील राजकारणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे. स्नेहा सोनकाटे यांची उमेदवारी आता अनेकांना अडचणीची ठरू शकते.

विधानसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवार कोण, कोण असणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. तुळजापुर विधानसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतली असुन दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी डॉ. स्नेहा सोनकाटे यांना जाहीर केली आहे.

तुळजापुर विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीला मानणारा वर्ग मोठा आहे. 2019 च्या विधानसभा सभा निवडणुकीत तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन अशोक जगदाळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडुन निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांना 37 हजार इतके मतदान मिळाले होते. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळेच काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव झाला होता.

यावेळी ओबीसी नेत्या डॉ. स्नेहा सोनकाटे यांचे ओबीसी समाजासाठी मोठे काम आहे. त्या धनगर समाजाच्या असुन तुळजापुर विधानसभा मतदार संघात धनगर समाज तसेच ओबीसीचे मतदान मोठे आहे. त्याचबरोबर या मतदार संघातील एससी समाजाचे मतदानही मोठे असुन हा समाज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मानणारा आहे. त्यामुळे या मतदार संघातील धनगर, ओबीसी आणि एससी समाजाचे मतदार डॉ. स्नेहा सोनकाटे यांच्या पाठीशी राहिले तर डॉ. स्नेहा सोनकाटे यांची उमेदवारी या मतदार संघातील बलाढ्य उमेदवारांना घाम फोडु शकते. त्याचबरोबर ओबीसी नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांचे सहकार्य डॉ. स्नेहा सोनकाटे यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदार संघात डॉ. स्नेहा सोनकाटे या राजकीय क्रांती घडविणार का? हे पाहणे गरजेचे आहे.

 
Top