धाराशिव (प्रतिनिधी) -  सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकारने चार हजार 892 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे. पुढील 90 दिवस हे खरेदी केंद्र सुरू राहणार कहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे.केंद्र सरकार सोयाबीनचे भाव 5000 असावा यासाठी उपाययोजना करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

शुक्रवारी धाराशिव तालुक्यातील कनगरा येथे कनगरा पाटी ते कनगरा गावांपर्यंतच्या अडीच कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व 10 लाख रुपयांच्या आमदार निधीतून पूर्ण केलेल्या श्री हनुमान मंदिरा समोरील सभामंडपाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांसोबत बैठक घेवून आमदार पाटील यांनी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आहे. त्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रता पहायला मिळत आहे त्यामुळे विचारपूर्वक 15 ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील 57 पैकी 25 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. ज्या मंडळात अतिवृष्टी नाही, तेथेे पंचनामे करण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या आता दूर करून तेथील पीक नुकसानीचेही पंचनामे करण्याबाबत तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. अतिवृष्टी नाही, मात्र नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेली आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आवर्जून तक्रार नोंदवून तातडीने पंचनामे करवून घ्यावेत. पंचनामे करून घेताना काही अडचणी आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. धाराशिव तालुक्यातील वडाळा, कनगरा, धुत्ता आदी गावातील पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीची आमदार पाटील यांनी पाहणी केली.

यावेळी सुधाकर गुंड गुरुजी, दत्ता सोनटक्के, तानाजी गायकवाड यांच्यासह गावातील शरद पाटील, संजय दळवे,  महेबूब शेख, कमलाकर दळवे, श्रीधर इंगळे, सुरेश माने, धनंजय तिघाडे, शिराज शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top