धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, तुळजापूर, उमरगा - लोहारा व भूम- परंडा- वाशी हे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी धाराशिव, परंडा व तुळजापूर यापैकी दोन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला उमेदवारी देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व पक्ष नेते संजय निंबाळकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दि.15 ऑक्टोबर रोजी दिली.
धाराशिव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक अध्यक्ष शेखर घोडके, रणजीत इंगळे, पदवीधर अध्यक्ष रणजीत कोळपे, नाना जमदाडे, आप्पा पडवळ, बिलाल शेख आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दुधगावकर म्हणाले की, जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पक्षाध्यक्ष शरद पवार व कोअर कमिटीच्या सदस्यांनी घेतल्या आहेत . धाराशिव, परंडा, तुळजापूर व उमरगा या मतदारसंघासाठी 16 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. मी धाराशिव - कळंब मतदारसंघासाठी इच्छूक असून पक्ष वाढीसाठी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी आमदार असणे गरजेचे आहे त्यामुळे मी आग्रहाने पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या 5 वर्षांपासून पक्ष कार्यकर्त्यांशी व जनतेशी व शेतक-यांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणीत समजून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले शेतक-यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केले असल्याचे दुधगावकर यांनी सांगितले . जिल्हयातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. फक्त कागदोपत्रीच विकास केल्याचे भासविला असल्याचा त्यांनी आरोप केला. तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचाराचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत हिरीरीने केल्यामुळे त्यांना मोठी आघाडी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी संजय निंबाळकर म्हणाले की, मी तुळजापूर मतदारसंघातील सर्व गावात मागील काही महिन्यांपासून सकाळी व संध्याकाळी गावांना भेटून तेथील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी निंबाळकर यांनी अनेक गावात रस्ते नाहीत. त्याप्रमाणे विद्यापीठ कमिटीवर काम करताना आपण 30 कोटी रूपयांची कामे केली असल्याचे सांगितले.