धाराशिव (प्रतिनिधी)-  निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. तरी पण निवडणुकीत 100 टक्के मतदान होत नाही. लोकांमध्ये मतदानविषयी जागृती व्हावी व देशात लोकशाही मजबूत व्हावी यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणीच्या वतीने मतदान जनजागृती करण्यासाठी सकाळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. अठरा वर्षाच्या पुढील सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे परगावी राहणारे जवळचे नातेवाईक, मामा, मामी, मावशी, आत्या, आजी, आजोबा व जवळच्या नातेवाईकांनी 100 टक्के मतदान करावे म्हणून पोस्टकार्ड  पाठवून आवाहन केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने किमान पाच पोस्टकार्ड  पाठविली. या कार्याचा शुभारंभ अशोक पाटील शिक्षणाधिकारी प्राथमिक, सुधा साळुंके शिक्षणाधिकारी माध्यमिक,  असरार सय्यद  गट शिक्षाधिकारी पं .स .धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आला.  पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या जवळच्या नातेवाईक यांना 1500 पत्रे एकाच वेळी पाठविण्यात आली. या कार्यात शाळेतील 260 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिक्षण अधिकारी प्राथमिक, माध्यमिक, गटशिक्षणाधिकारी यांनी सर्व मुलांचे कौतुक केले व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.  तसेच सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात जाऊन मुलांची गुणवत्ता पाहिली  व समाधान व्यक्त केले. तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी  प्रकाश पारवे, भारत देवगुडे, शिक्षण विस्तार अधिकारी, निलेश नागले केंद्रप्रमुख हे उपस्थित होते. सदर उपक्रमात सुनीता कराड, वर्षा डोंगरे,मंजुषा नरवटे, क्रांती मते, सुलक्षणा ढगे, सत्यशिला म्हेत्रे, राधाबाई वीर, उत्तम काळे, दिनेश पेठे, हनुमंत माने, दादासाहेब कचरे यांनी परिश्रम केले.


 
Top