धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असो अथवा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा किंवा अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेला सोलापूर-तुळजापुर-धाराशिव रेल्वेमार्ग. मागील पाच वर्षात आपण सर्वांनी मिळून मोठ्या ताकदीने अनेक महत्वपूर्ण प्रकल्प पुढे मार्गी लावण्याचे काम केले आहे. अनेक अडचणींवर आजवर मोठ्या हिंमतीने मात करीत आपल्या परिसराचा कायापालट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यापुढेही कुलस्वामिनी तुळजाभवानी आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या आशीर्वादाने अधिक ताकदीने प्रलंबित प्रकल्प पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

आमदार पाटील यांची तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने रविवारी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधला. आमदार पाटील म्हणाले की, मागील कार्यकाळात ज्या गोष्टी आपल्या सर्वांच्या साथीने पूर्ण करण्याचा शब्द दिला होता जवळपास त्या सर्व बाबी महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील 24 महिन्यांत मतदारसंघात दोनशेहून अधिक रस्ते मंजूर केले. अनेक कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. कृष्णा खोऱ्याचा विषय आपल्या साथीने लावून धरला. कौडगाव आणि तामलवाडी एमआयडीसीचे काम पूर्ण करणे, तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याचा विषय असेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्न तेरणा उपसासिंचन दुरुस्ती योजना याबाबतही आमदार राणाजगजितसिंह पाटील आग्रही आहेत.

 
Top