भूम (प्रतिनिधी)-  भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी दि.26 ऑक्टोबरपासून 1 हजार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 243 परंडा विधानसभा मतदारसंघात कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी 1 हजार प्रशिक्षणार्थी व महसूल विभागातील इतर 300 कर्मचारी असे एकूण 1300 कर्मचाऱ्यांच्या जेवणाचे नियोजन निवडणूक विभागाने धाराशिव येथील ठेकेदारास दिले आहे. प्रशिक्षणासाठी भूम, परंडा व वाशी तालुक्यातील गावखेड्यातील कर्मचारी उपस्थित होते. या ठेकेदाराने कर्मचारी यांना दुपारच्या सत्रात भाजी, भात, चपाती व गोड पदार्थ देणे बंधनकारक असताना प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना फक्त भात व सांभार देण्यात आले. प्रशिक्षणार्थी यांना देण्यात आलेले भात व सांभार निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार थेट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केली. प्रशिक्षणार्थ्यांची समजूत काढत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. परंडा विधानसभा मतदारसंघात प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या कारणाने ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचारी यांचा 1 दिवसाचा जेवण भत्ता देणार असेही आश्वासन कर्मचाऱ्यांना दिले. 


प्रशिक्षणार्थी यांना आजचे जेवण देणाऱ्या ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस देऊन योग्य ती कारवाई करणार असून, आजचा प्रशिक्षणार्थी यांचा जेवण भत्ता कापण्यात येणार नाही.

वैशाली पाटील

निवडणूक निर्णय अधिकारी 243 परंडा विधानसभा

 
Top