धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला म्हणून अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, साहित्य भारती आणि कलाविष्कार अकादमी धाराशिव तर्फे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अनेक वर्षापासून मागणी असलेला परंतु अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला निर्णय घेतला. बालकुमार साहित्य संस्थेच्या सर्वसाधारण सभेतही याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. सर्व मराठी माणसांसाठी, साहित्यिक व साहित्य रसिकांसाठी ही अभिमानाची बाब असल्याने या विषयावर "अभिजात मराठी अभिमान सभेचे" आयोजन केले होते. या सभेत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल युवराज नळे यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला आणि त्याला जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे, डॉ अभय शहापूरकर ॲड जयश्री तेरकर व मीना महामुनी यांनी अनुमोदन दिले आणि सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला. मराठी विषयाचे विभागप्रमुख डॉ सहदेव रसाळ आणि समिक्षक डॉ कृष्णा तेरकर यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या सर्व प्रयत्नांचा आढावा घेत मायमराठीचे महत्त्व विशद केले. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा धाराशिव, साहित्य भारती आणि कलाविष्कार अकादमी अशा संयुक्त विद्यमाने जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या अभिजात मराठी अभिमान सभेसाठी प्रा अभिमान हंगरगेकर, विजय गायकवाड, रणजित रणदिवे, अब्दुल लतीफ, मधुकर हुजरे, मुकुंद पाटील, दिलीप पाठक नारीकर, योगेश कुलकर्णी इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन धनंजय कुलकर्णी यांनी केले.