तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक वैभव लेणेकर यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत अधिकारी कर्मचारी यांना दिला जाणारा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार सन 2022 महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वरळी, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, कृषी सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
वैभव लेणेकर यांनी मौजे वानेवाडी, हिंगळजवाडी, किनी या गावात महिला शेती शाळेचा अभिनव उपक्रम राबविला या प्रयोगाद्वारे कृषी विभागाचे आधुनिक तंत्रज्ञान व विविध योजना महिला शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची दखल घेऊन तत्कालीन कृषी सचिव सुहास दिवसे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी स्वतः महिला शेतीसाठी वर्गात उपस्थित राहून या स्तुत उपक्रमाची प्रशंशा केली होती.
वैभव लेणेकर यांनी मौजे वानेवाडी, व हिंगळजवाडी येथे सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत तसेच टोकन पद्धतीने सोयाबीन लागवडी बाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून जवळपास 1000 एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची टोकन व बीबीएफ पद्धतीने लागवड करून घेतली त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडली. तसेच सोयाबीन पिकाच्या पीक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत भाग नोंदवून जिल्ह्यात व तालुक्यात प्रथम क्रमांकाची बक्षीस प्राप्त केले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिक उत्पादनाबाबत सकारात्मक स्पर्धा निर्माण झाली
वैभव लेनेकर हे मागील 15 वर्षांपासून धाराशिव तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध योजना व उपक्रमांची माहिती विविध शेतकरी मेळावे, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच शेती शाळेच्या माध्यमातून पोहोचवीत आहेत. सन 2021 मध्ये महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आलेला इ पिक पाहणी कार्यक्रमांतर्गत मौजे वानेवाडी व बालपिरवाडी या गावात 100% शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करून घेतली त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.
कोरोना काळात धान्यदान संकल्पनेतून शेतकरी यांच्याकडील धान्य व भाजीपाला गरजू व्यक्तीपर्यंत उपलब्ध करून दिले तसेच बांधावर खत योजनेअंतर्गत 250 मे. टन खत शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध करून दिला त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला व वेळेची बचत झाली. तसेच सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी त्यांनी विविध रेडिओ टॉक व प्रशिक्षण कार्यक्रम घेतले ,सोयाबीन घरगुती बियाणे वापराबाबत घरोघर जाऊन जनजागृती केली. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक शेतकरी मासिक वर्गणीदार बनविले या त्यांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले होते. कृषी विभागामार्फत आयोजित विविध कृषी महोत्सव, क्रीडा महोत्सव व रानभाजी महोत्सव या सारख्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला .या विविध उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत दिला जाणारा कृषी सेवा रत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.