धाराशिव (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणूक व्यवस्थितीत पार पाडण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केलेली असते. या पथकामध्ये दुसऱ्या तालुक्यातून कर्मचारी, अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी नियुक्त केले जाते. या नियुक्ती केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक दिवसाचा जेवणाचा व इतर भत्ते देण्याची तरतुद महाराष्ट्र सरकारने 18 मार्च 2014 रोजी विशेष जीआर काढून केली आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत विविध पथकात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोणताही भत्ता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी गुरूवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवदेन देवून लोकसभा निवडणुकीतील भत्त्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आपल्या कार्यालयाच्या पत्रानुसार चेकपोस्ट सह विविध पथक नेमण्यात आले होते. दिवस रात्र शासनाने सोपविलेले काम कृर्त्यव्य दक्षपणे पार पाडले. शासन निर्णयाच्या अधिन राहून आपल्याला भत्ता देण्यात येईल. असे सांगितले होते. लोकसभा निवडणूक होवून पाच महिन्यानंतर ही अद्याप लोकसभा निवडणुकीतील भत्ते मिळालेले नाहीत. वारंवार भत्त्याची मागणी करूनही प्रशासनातील काही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तरी जिल्हाधिकारी यांनी शासन निर्णयानुसार भत्ता द्या अशी मागणी कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली आहे.