धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आले असताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयासोबत शिक्षकांच्या राज्यस्तरीय विविध 9 प्रश्ना संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली होती. त्यातील 5 प्रश्न तातडीने सोडवले गेले आहेत.
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांना मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीची रक्कम 14 लाख रुपया वरून 25 लाख रुपये करावी, 20 पटाच्या आतील शाळेवरील कंत्राटी शिक्षक भरतीचा 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करावा,100 पटापर्यंतच्या शाळेला मुख्याध्यापक पद मंजूर करावे, आधार व्हॅलिडेशन वर संच मान्यता न करता प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थितीवर करावी, BLO च्या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशा प्रमुख मागण्यांचा सामावेश होता.
त्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्षकांना मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीची रक्कम 14 लाख रूपया वरून 20 लाख रुपये करण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच माध्यमिक शाळे साठी 100 पटसंख्या असली तरी मुख्याध्यापक पद मंजूर करण्यात आले आहे. सन 2023-24 ची संचमान्यता ही आधार व्हॅलिडेशन वर न करता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची पडताळणी करून करावी असे पत्र संचालकानी काढले आहे. 20 पटाच्या आतील शाळेवर कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्याचा काढण्यात आलेला 5 सप्टेंबर 2024 चा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. BLO चे काम हे शाळाबाह्य असून शिक्षकांना देण्यात येवू नये असे पत्र ही संचालकांनी काढले आहे.
वरील सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस या सर्वांचे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले असून, या निर्णयाचे स्वागत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य कार्यकारणी सदस्य बशीर तांबोळी, सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, जिल्हा उपाध्यक्ष कैलास मोहिते, मालोजी वाघमारे, नगरपरिषद विभाग जिल्हाप्रमुख राजेंद्र पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आनिशा कदम, महेबूब काझी,राजाभाऊ आकोसकर, सुरेश भालेराव, संतोष डोके, दीपक ठोंबरे, नागनाथ मुडबे, बब्रुवान भोसले, युवराज पिंगळे, दत्तात्रय लोहार, प्रफुल्ल झाडबुके, राजेंद्र घोडके, बिलाल सौदागर, लक्ष्मण तानले,श्री बोडखे, मारोती काळे,बालाजी निंबाळकर, सुधीर पवार, लक्ष्मण घोडके, बाळासाहेब कांबळे, महेंद्र रणदिवे, सचिन भांडे, सचिन ताकपिरे, अरुण पाटील, आर.आर.पाटील, चांगदेव थोरात,धम्मदीप सवई, नितीन सलगरे, मिलिंद धावारे , पवण क्षिरसागर, मिलिंद जानराव, सुधीर घोडके, आदींनी स्वागत केले आहे.