धाराशिव (प्रतिनिधी)- उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा एकदाचा सुटला आहे. विधानसभेची ही जागा शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मिळाली असून, जुने शिवसैनिक आणि सध्याचे भाजपा कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे उस्मानाबाद-कळंब मतदारसंघात शिवसेना विरूध्द शिवसेना असा सामना रंगणार आहे. गेल्या आठ दिवसापासून अनेक नेत्यांची नावे वेगवेगळ्या पक्षांकडून आणि समर्थकांकडून रोज चर्चेत येत होती.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पिंगळे शिवसेना पक्षाकडून इच्छुक होते. परंतु त्यावेळी कैलास पाटील यांना सेनेकडून तिकीट मिळाल्यामुळे पिंगळे यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत अपक्ष लढूनही अजित पिंगळे यांना तब्बल 20 हजार 570 मते मिळाली होती. त्यानंतर अजित पिंगळे यांनी भाजपात प्रवेश केला होता. ते सध्या भाजपाचे कळंब तालुकाध्यक्ष असून आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. दोन महिन्यापूर्वी उबाठा गटाचे कळंब तालुकाध्यक्ष शिवाजी कापसे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. मूळचे शिवसैनिक असलेले अजित पिंगळे यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे एकतर्फी वाटणारी ही लढत चुरशीची होणार आहे. धाराशिवच्या उमेदवारीबाबत शिवसेना शिंदे गटाकडून सुधीर पाटील, सुरज साळुंखे, शिवाजी कापसे आदींची नावे स्पर्धेत होते. परंतु ऐन वेळी शिवसेनेच्या बाहेरचा उमेदवार दिला गेला.