धाराशिव (प्रतिनिधी) - लातूर येथे झालेल्या आंतरशालेय विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेत छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थिनी सफल रवींद्र केसकर हिने अव्वल स्थान पटकावले आहे. 17 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मागील सलग तीन वर्षांपासून सफल केसकर पात्र ठरली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून लातूर येथे मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धाराशिव येथील जिल्हास्तरीय स्पर्धेत अजिंक्य राहिलेल्या सफल केसकर हिची लातूर येथे 17 वर्षे वयोगटाखालील विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली होती. क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करीत सफल केसकर हिने विभागीय स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले आहे. सलग तिसऱ्या वर्षी आंतरशालेय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. क्रीडा प्रशिक्षक शरीफ शेख, वसीम सय्यद आणि संजय देशमुख यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतूक केले जात आहे.

 
Top