धाराशिव (प्रतिनिधी)- रस्त्यांवरील खड्डयांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेली डोळेझाक एका तरुणाचा बळी घेऊन गेली आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर ही दुर्घटना घडली. ओंकार जाधवर असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालून रस्त्यावरील खड्डयांबाबत जाब विचारुन धारेवर धरले. रस्त्याची डागडुजी करण्यासाठी कार्यारंभ आदेश निघालेला असताना अधिकाऱ्यांकडून दखल घेतली न गेल्यामुळे एका तरुणाला जीव गमवावा लागला. आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात? असा सवाल करुन कार्यकारी अभियंत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. एकजणाचा बळी गेल्यानंतर खडबडून जाग आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.
धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक या मार्गावर खड्डयांचे साम्राज्य आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरुन प्रवास करताना दररोज जीवघेणी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईपर्यंत कार्यकारी अभियंत्यांना जागेवरुन हलू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत अभियंत्यांना खड्डयामध्ये बसवून ठेवण्याचा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तात्काळ खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे खड्डयांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी एकाचा बळी जाण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागामुळे आली असल्याची भावना नागरिकांमधून होत आहे.
यावेळी माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नितीन शेरखाने, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, पंकज पाटील, अमित उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, गणेश साळुंके, अजिंक्य राजेनिंबाळकर, गणेश राजेनिंबाळकर, सतीश लोंढे, संदीप शिंदे, जगदीश शिंदे, हनुमंत देवकते, गणेश आसलेकर, महेंद्र शिंदे, मुन्ना पाटील, हर्षद ठवरे, संकेत सूर्यवंशी, लक्ष्मण जाधव, मुकेश चौगुले, आश्रुबा मुंडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.