धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून, युवा नेते दत्ता कुलकर्णी यांच्या सारख्या नव्या चेहऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन समितीमध्ये धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. दत्ता कुलकर्णी यांना सहकार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा अध्यक्षतेखाली समितीत धाराशिव जिल्ह्यातून दत्ता कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे.
या समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून केंद्रीयश मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, माजी मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील मातब्बर नेते मंडळींचा समावेश आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व्युहरचना आखून काम करायचा आहे. सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर, मराठवाड्यातून दत्ता कुलकर्णी, अशोकराव जगताप, उत्तर महाराष्ट्रातून रोहित निकम, केदार आहेर, मुंबई विभागातून नितीन बनकर तर विदर्भ मधून योगेश बन यांची निवड करण्यात आलेली आहे.