धाराशिव (प्रतिनिधी)- चोराखळी येथे डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांच्या नेतृत्त्वात दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक आणि साभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी सौ मंदोदरी शिंदे , गावचे सरपंच सौ सीमा सोनटक्के व डॉ स्नेहा सोनकाटे यांच्या हस्ते करण्यात आले .हे स्मारक राजकीय अडचणींमुळे रखडले होते, त्यामुळे हा प्रश्न डॉ. सोनकाटे यांनी आपल्या हाती घेत लोकार्पण करून पुढाकार घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात पापनाश मंदिराच्या दर्शनाने झाली, त्यानंतर धनगर, बंजारा, वंजारी, तेली, माळी, सुतार, भावसार, मातंग, बौद्ध, मुस्लीम इत्यादी विविध समाजबांधवांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचा महाभिषेक झाला. विविध समाजाच्या प्रतिनिधींनी या वेळी आपली मते आणि भावना व्यक्त केल्या.

आपल्या भाषणात डॉ. स्नेहाताई सोनकाटे यांनी रामायणातील प्रतीकांचा संदर्भ देत जातीय असमानतेविरोधातील संघर्षावर भाष्य केले. “वानरसेनेने रावणाच्या सोन्याच्या लंकेवर विजय मिळवला, तशाच प्रकारे, ओबीसी, भटके-विमुक्त आणि उपेक्षितांनी एकत्र येत आपली ताकद दाखवावी आणि अन्यायकारक राजकारणाचा पराभव करावा,“ असे त्यांनी सांगितले. त्यांनी भुजबळ साहेब आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांचे नेतृत्त्व राम आणि लक्ष्मणासारखे लाभल्याचेही नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करत, “चोराखळीतील चोरांच्या टोळ्यांना आम्ही हाकलून देणार आहोत, आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चोराखळीला पुन्हा सोनखळी बनवू,“ असे ठामपणे सांगितले. राज्यातील जातीयवादाच्या राजकारणाचे मूळ शरद पवार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

 
Top