उमरगा (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर .यांनी उपेक्षीत समाजाला न्याय देण्यासाठी राजकीय आरक्षण व राजकीय प्रतिष्ठा मिळवुन दिली. उमरगा- लोहारा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी आरक्षीत असुन या मतदारसंघात बहुसंख्य व मुळ उपेक्षीत असलेल्या समाजाला उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी देऊन न्याय दयावा. उमरगा व लोहारा तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने युवक गुन्हेगारीकडे वळत आहेत. उमरगा शहरात दिवसा मर्डर होत आहे. शहरात होणाऱ्या विकासकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असुन प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा वचक राहीला नाही. शिवशक्ती-लहुशक्ती-भिमशक्तीच्या वतीने राज्यात उमरगा, अंबरनाथ, मेहकरसह चार जागांची मागणी केली आहे. मी विद्यार्थी दशेपासून या मतदारसंघात सामाजीक कार्याच्या माध्यमातुन सक्रिय असुन मला विधानसभेची उमेदवारी मिळेल याची मला खात्री आहे. आमच्या समाजाचे मतदान 288 पैकी 68 मतदारसंघात निर्णायक आहेत असे मत उमरगा-लोहारा मतदार संघाचे इच्छुक उमेदवार अशोकराजे सरवदे यांनी व्यक्त केले. शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी (ता.सहा) रोजी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर हे विक्रमी मतानी विजयी झाले. त्यांच्या मताधिक्यात दलित समाजाचा सिंहाचा वाटा आहे. या लोकसभेत ज्या इच्छुक उमेदवारांनी निंबाळकर यांच्या प्रचारात सक्रिय भुमिका बजावली त्यांचाच विधानसभा उमेदवारी देण्यासाठी विचार व्हावा. निवडून येण्यासाठी फक्त पैशानेच उमेदवार मोठा नसुन तो जनतेत मिसळून त्यांचे अडीअडचणी सोडविणारा असावा असेही ते म्हणाले. उमरगा विधानसभेवर दलित समाजाव्यतीरीक्त इतर समाज हक्क सांगणार असेल तर त्यांनी हक्कासोबत कर्तव्याचा स्विकार करावा व बाबासाहेबांची विचारधारा रूजविण्यासाठी प्रयत्न करावे. मला उमेदवारी न मिळाल्यास मी अपक्ष निवडणुक लढविणार नसल्याचे सांगितले. मी निवडूून आल्यास युवकांना रोजगार देणे, वाढत्या गुन्हेगारीला रोखणे, एमआयडीसीचा विस्तार करणे, शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉक्टर चंद्रशेखर गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, संजय सरवदे जिल्हा कार्याध्यक्ष युवक काँग्रेस धाराशिव, संजय कांबळे तालुका अध्यक्ष अण्णाभाऊ साठे जयंती कमिटी उमरगा, राम कांबळे, नेताजी गायकवाड वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते.