उमरगा (प्रतिनिधी)-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाच्या काळात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्यामुळे उमरगा लोहारा तालुक्याला विक्रमी निधी प्राप्त झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, वीजबिल सवलत योजना मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, सोयाबीन व कापूस अनुदान आदी लोकोपयोगी योजना या सरकारने राबवल्या.  यामुळे जनतेत महायुती शासनाबद्दल सकारात्मक लाट आहे. असे मत माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील सर्व बुथप्रमुखांचा मेळावा शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. उपस्थित बुथप्रमुख, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी, मागील 15 वर्षांच्या काळात माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जात, धर्म, पक्ष न पाहता प्रामाणिकपणाने त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. गावागावात घर तिथे नळ, गाव तिथे स्मशानभूमी, गावातर्गत सिमेंट रस्ते, प्रत्येक समाजाला समाजमंदिर, धार्मिक स्थळांचा विकास, तसेच समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले. 

यावेळी युवा सेना विभागीय निरीक्षक किरण गायकवाड, योगेश्वर पुरोहित यांनी यावेळी उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले. जितेंद्र शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमात मुरूम नगरीचे चंद्रशेखर मुदकन्ना हे त्यांच्या मुरूम व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात स्वगृही परतले. तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनाही यावेळी पक्षप्रवेश झाला. तसेच गोपाळ घोडके यांची शिवसेना प्रणित भटक्या व विमुक्त जाती सेलच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, बळीराम सुरवसे, जगन्नाथ पाटील, सचिन जाधव, ऍड.आकांक्षा चौगुले, विनोद कोराळे, दत्ता मोरे, विलास भगत, यांच्यासह दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप जगताप यांनी तर आभार प्रदर्शन युवराज गायकवाड यांनी केले.

 
Top