धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील 4 हजार कोटी रुपयांचे उद्योग गुजरात धार्जीण्या खोके सरकारने गुजरातला पाठविले आहेत. विशेष म्हणजे 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार अशी जुमलेबाजी करीत मोदी सरकार सत्तेवर आले. अगदी तीच कॉपी राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार हे महायुतीचे सरकार करीत आहे. त्यामुळे उद्योग राहू द्या महाराष्ट्राला, तुम्ही जा गुजरातला असे उपहासात्मक अनोखे आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार युवक काँग्रेसच्यावतीने करीत महायुती सरकारचा दि.7 ऑक्टोबर रोजी निषेध करण्यात आला.

राज्यातील भाजप शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पाठविण्यात मश्गुल आहे. इतकेच नव्हे तर हे सरकार अजून नवीन उद्योग आणू असे सांगून महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे.

या सरकारने महाराष्ट्रातील युवकांना देशोधडीला लावण्याचे काम देखील चालविले आहे. तामिळनाडूतील फोर्ड उद्योग बाहेर गेला. मात्र तेथील मुख्यमंत्र्यांनी तो पुन्हा तामिळनाडूमध्ये आणून तेथील युवकांच्या हाताला काम मिळवून देण्याचे काम केले आहे. मात्र महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या फसव्या योजना राबवून दररोज घोषित करून युवक व जनतेला फसविण्याचे काम चालू आहे. तर वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून पैसे देऊन लोकांची दिशाभूल करणाऱ्या या फसव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत महायुती सरकारचा निषेध केला. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, प्रदेश सचिव रोहित बागल, आदित्य पाटील, पृथ्वीराज आंधळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पंकज भोसले, प्रदेश सचिव मजहर शेरीकर, तालुकाध्यक्ष अमर गुंड, शिवशांत काकडे,कळंबचे गणेश खराडे, सर्फराज कुरेशी, कुणाल कर्णवर, अजिंक्य हिबारे, अभिजीत काळे, हेमंत भोरे, संतोष अपसिंगेकर व बालाजी झेंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top