नळदुर्ग (प्रतिनिधी)- आई राजा उदो, उदोच्या जयघोषात व प्रत्येक हिंदु बांधवांच्या घरामध्ये घटस्थापना होऊन दि. 3 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग शहर व परीसरात शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग शहरात 6 ठिकाणी देवींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे दुपारी 1.30 वाजता आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठानास सुरुवात केली आहे. पुढील दहा दिवस श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून एकाच आसनामध्ये राहुन अतिशय कठीण अनुष्ठान करणार आहेत.
आई राजा उदो, उदोच्या जयघोषात नळदुर्ग शहर व परीसरात दि. 3 ऑक्टोबर शारदीय नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. प्रारंभी सकाळी प्रत्येक हिंदु बांधवांच्या घरात घटस्थापना करण्यात आली. नळदुर्ग शहरात शारदीय नवरात्र महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम शहरातील प्राचिन असणाऱ्या श्री अंबाबाई मंदिरात होत आहे. याठिकाणी जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट व श्री अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यावर्षी शारदीय नवरात्र महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंबाबाई मंदिर परीसरात महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत. ज्या ठिकाणी श्री महेश्वरानंद महाराज हे कठीण व लोक कल्याणासाठी अनुष्ठान करणार आहेत त्याठिकाणी सकाळी 10 वा. संकल्प यज्ञ करण्यात आला. यावेळी रुद्राभिषेक करण्यात आला. यावेळी 51 हजार रुद्रास सिद्ध करण्यात आले. हे सिद्ध करण्यात आलेले रुद्राक्ष श्री महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते दि. 4 ऑक्टोबर पासुन भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हा संकल्प यज्ञ दुपारी दीड वाजेपर्यंत चालला. यानंतर दुपारी दीड वाजता श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठानास सुरुवात केली आहे. आता पुढील दहा दिवस म्हणजे दि. 12 ऑक्टोबर पर्यंत श्री महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून एकाच आसनात अन्न -पाणी तसेच सर्व नैसर्गिक विधिंचा त्याग करून हे अनुष्ठान करणार आहेत. नळदुर्गच्या भुमित हे अनुष्ठान होत आहे हे खरे तर नळदुर्गकरांचे भाग्य आहे.त्यामुळे नळदुर्ग शहर व परीसरातील हिंदु बांधवांनी याठिकाणी दर्शनाचा लाभ घेणे गरजेचे आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त नळदुर्ग शहरात शिवशाही तरुण मंडळ, ब्राम्हण गल्ली, जय भवानी तरुण मंडळ, जय हिंद तरुण मंडळ, व्यासनगर, भवानीनगर व इंदिरानगर या सहा ठिकाणी देवींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
दि. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणाऱ्या श्री अंबाबाई नवरात्र महोत्सवानिमित्त जगदंबादेवी (अंबाबाई) देवस्थान ट्रस्ट व अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.