धाराशिव - भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला .

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो .त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतरही वाचन केलं पाहिजे.  डॉ. अब्दुल कलाम यांची विविध क्षेत्रात असलेली कामगिरी ,तसेच मिसाइल मॅन म्हणून त्यांचे  भारतासाठी असलेले योगदान ,अशा बऱ्याच गोष्टीवर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. 

महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये घेण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिनासाठी प्राचार्य डॉ.माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. सुनिता गुंजाळ  बोलताना  म्हणाल्या की , आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल की वाचनामुळेच व्यक्तीमध्ये कर्तृत्व , नेतृत्व आणि वक्तृत्व या कला विकसित होतात.  चळवळीतील कुठल्याही कार्यकर्त्यांचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक जण हा अगोदर उत्तम वाचक होता. त्यानंतरच नेतृत्व आणि वक्तृत्व हे बहरत गेलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पुस्तकावर अतोनात प्रेम केलं. त्यांची वैयक्तिक ग्रंथसंपदा ही  खूप मोठ्या प्रमाणात होती .पुस्तकेच आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचनाला महत्त्व द्यावे.

यावेळी ग्रंथालयामध्ये पुस्तक प्रदर्शन  भरवून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला.*वाचन प्रेरणा दिना निमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी एक अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना सांगितला , महाविद्यालयाच्या ग्रंथालयाची रीडिंग रूम ही अध्यायावत आणि सुसज्ज असून येथे शेकडो विद्यार्थी अभ्यासासाठी बसतात. जे विद्यार्थी जास्तीत जास्त वेळ रीडिंग रूम मध्ये बसून अभ्यासक्रमासोबतच इतरही पुस्तकाचे वाचन करून आपला उत्साह वाढवतील व इतर विद्यार्थ्यांमध्येही वाचनाची चुरस निर्माण करतील , आशा जास्त वेळ बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी बक्षीस जाहीर केले . बक्षीसांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त विद्यार्थी रीडिंग रूम मधून अभ्यास करतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली* या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल बिभीषण शिरसट ,सविता नलावडे , सुक्षमा टेकाळे ,हनुमंत सुरवसे यांनी विशेष परिश्रम घेतले .

 यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक , विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येत ग्रंथालयाला भेट देऊन वाचन करण्याचा प्रयत्न केला.


 
Top