धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात मागील दोन दिवसांत पुन्हा एकदा परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शेतकरी बांधवांनी या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांकडे आग्रही मागणी करावी. तसेच पीकविमा कंपनीला 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती कळवावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

रविवारी आणि सोमवारी रात्री जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यापूर्वीही 37 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. राज्य सरकारकडे पीक नुकसानीचे अनुदान मागणीसाठी आताच्या पावसात नुकसान झालेल्या पिकांचे तलाठ्यांमार्फत पंचनामे होणे आवश्यक आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे रितसर अर्ज देवून पंचनाम्याची मागणी करून त्याची पोच आपल्याकडे ठेवावी. तसेच पीकविमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाऊस झाल्यापासून 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवावी, म्हणजे आपल्या भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर होईल. 24 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला किंवा सलग दहा दिवस दररोज किमान 10 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला तर राज्य सरकारकडून आपल्याला पीक नुकसानीपोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू असल्याचे अभिवचन आमदार पाटील यांनी दिले आहे.

 
Top