धाराशिव (प्रतिनिधी) - राज्यातील अन्नदाता शेतकरी केंद्रबिंदू मानून यापूर्वीच्या सरकारकडून झालेल्या चुका दुरूस्त करून धोरणात्मक निर्णय घेणारे महायुती सरकारने काम केले आहे. केंद्र सरकारकडून सोयाबीन, कांदा आणि दूधाची दरवाढ होण्यासाठी प्रयत्न, राज्य सरकारकडून शेतीसाठी मोफत वीज, एक रूपयात पीकविमा, शेतीसाठी सिंचन व्यवस्था, लाडकी बहिण योजना, अशी अनेक धोरणात्मक निर्णय आणि योजना महायुती सरकारने अंमलात आणल्या आहेत. अशाच धोरणात्मक निर्णयासाठी महायुतीचे आपले सरकार पुन्हा सत्तेत असणे आवश्यक आहे, असे मत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
नाफेड व तालुका शेतकरी सहकारी संस्थेच्यावतीने धाराशिव येथे मंगळवारी सोयाबीन आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना सक्षम करणे ही महायुती सरकारची जबाबदार आहे. त्यासाठी भविष्यात अनेक महत्वाचे आणि चांगले निर्णय घेतले जाणार आहेत. आपल्या जिल्ह्याचा कायापालट होण्यासाठी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या योजनेचे पाणी रामदरात तलावात येेणार आहे. रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने कौडगाव येथे दीड हजार एकरवर टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारले जाणार आहे. 24 कोटींच्या निधीतून तिथे रस्त्याची कामे सुरू झाली आहे. या ठिकाणी 10 हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. तर तामलवाडी येथे 370 एकरवर एमआयडीसी उभारून बारा हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे कामही वेगाने सुरू झाले आहे. निम्न तेरणाच्या कामासाठी राज्य सरकारने 113 कोटींचा निधी मंजूर केला आहे. धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आहे. आता नवीन जागेत जवळपास 400 कोटींची इमारत उभी केली जाणार आहे. तूळजापूरला 50 कोटींचे प्रशिक्षण केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा, धाराशिव येथील दूध संघाच्या जागेत आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी बहुउद्देशीय सभागृह, शादीखाना, अभ्यासिका, अशी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.
तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आली आहेत. 60 कोटींच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच तुळजापूरमध्ये दोन हजार कोटींची गुंवणूक होणार आहे. त्यामुळे दररोज किमान 20 हजार भाविक तुळजापूरला थांबतील आणि वेगवेगळ्या व्यवसायातून हजारोंना रोजगार मिळेल. सध्याचे महायुतीचे सरकार धोरणात्मक निर्णय घेवून सर्व काही जनतेसाठी काम करीत आहे. त्यामुळे पुढील काळातही महायुती सरकार येण्यासाठी लोकांनी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.