धाराशिव (प्रतिनिधी) - 1978 पासून माझे थोरले बंधू सुधाकर गुंड गुरुजी व आमचे कुटुंब जन संघ व भारतीय जनता परिवार व आताची भारतीय जनता पार्टीपर्यंत निगडित आहे. अगदी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायतवर सत्ता आणली होती. मी 2019 मध्ये तुळजापूर विधानसभेसाठी निवडणुकीचा अर्ज भरला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी 2024 मध्ये तुम्हाला नक्की भाजपच्यावतीने उमेदवारी दिली जाईल असा शब्द दिला होता. मात्र त्यांनी तो शब्द पाळला नसून जिल्ह्यातील सहकार क्षेत्र बुडविणाऱ्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना तिकीट दिले अशी तोफ डागली. तसेच मी या मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तो कुठल्याही परिस्थितीत काढणार नसून मी पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याचा ठाम निर्धार अपक्ष उमेदवार ॲड व्यंकटराव गुंड यांनी दि.28 ऑक्टोबर रोजी व्यक्त केला.
ॲड व्यंकटराव गुंड यांनी आपला तुळजापूर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकरराव गुंड गुरुजी, प्रगतिशील शेतकरी सत्यवान सुरवसे, ॲड अजित गुंड-पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कापसे, रामदास गुंड, ऍड शरद गुंड, प्रेमनाथ पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ॲड गुंड म्हणाले की, भारतीय जनसंघ, जनता परिवार ते भारतीय जनता पार्टीमध्ये माझे कुटुंब एकनिष्ठेने राहून काम केलेले आहे. मला 2019 मध्ये तुळजापूर मतदार संघाचे तिकीट द्यायचे होते. मात्र ऐन वेळेस धाराशिवमधून निवडून आलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व त्यांना या मतदारसंघाचे तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला. आता या उमेदवारीवर माझा हक्क होता. मात्र त्यांनी मला उमेदवारी न देता आमदार पाटील यांना दिली असून ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाना, शेतकऱ्यांच्या हक्काची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सुत गिरणी व जिल्हा दूध संघ मोडून काढीत शेतकऱ्यांना देशोधडीला लावले असल्याचा जोरदार हल्ला त्यांनी चढविला. विशेष म्हणजे तेरणा कारखाना मराठवाड्यात पहिला कारखाना म्हणून ज्याची ओळख होती. तो नाडे व समुद्रे या मंडळींनी उभा केलेला होता. तर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची आर्थिक नाडी होती. ती बँकही संपवण्याचे महामाप या मंडळींनीच केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुत गिरणी मशिनरीची खरेदी कागदावर करुन करोड रुपयांचा भ्रष्टाचार केला. विविध मार्गाने जिल्ह्यातल्या सहकार संपवणाऱ्या आ राणा पाटील यांना उमेदवारी दिली आणि माझ्यासारख्या निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांवर म्हणजे माझ्यावरच खऱ्या अर्थाने अन्याय केला असल्याचा थेट आरोप त्यांनी भाजपच्या आश्वासन देणाऱ्या मंडळीवर करीत निशाणा साधला. मी जनतेच्या कल्याणासाठी बांधील असून ज्यांनी या जिल्ह्यामधला सहकार संपवला, सहकारातील चालणारे उद्योग संपवले. त्यांना उमेदवारी दिली गेली असे सांगत ते म्हणाले की या उलट मी सहकारी दूध संघ, सहकारी नागरी बँक पतसंस्था चालवतो व गरजू व्यक्ती तसेच शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. तसेच अडला नडल्या शेतकऱ्यांना मी आर्थिक मदत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मायबाप जनतेने माझ्यासारख्या उमेदवाराला निवडून देऊन या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. तसेच फक्त कागदोपत्री विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या आ. राणा पाटील या उमेदवाराला धडा शिकवावा, असे आवाहन ॲड गुंड यांनी केले.