धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे विद्यमान आमदार कैलास पाटील यांनी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत धाराशिवात रॅली काढली. या रॅलीने संपूर्ण शहरात जोशाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांची मतदारांशी जुळवलेली नाळ आणि त्यांचा प्रभाव पुन्हा एकदा दिसून आला.

आज सकाळी आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या प्रचार यात्रेला येरमाळातील येडाई देवीच्या दर्शनाने सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तेर येथील संत गोरोबा काकांचे दर्शन घेतले आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. या विविध तीर्थक्षेत्रांवर दर्शन घेऊन, आशीर्वाद घेताना त्यांनी आगामी निवडणुकीतील विजयासाठी देवी-देवतांची कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला.

धाराशिव शहरात दाखल झाल्यावर, रॅलीची सुरुवात अण्णाभाऊ साठे चौकातून झाली. रॅली मार्गे धारासूर मर्दिनी मंदिर, आणि हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी दर्गा या महत्वाच्या स्थळांवरून गेली. धारासूर मर्दिनी देवीच्या दर्शनानंतर, आमदार कैलास पाटील यांनी ख्वाजा शमशोद्दीन गाजी यांच्या दर्ग्यावर चादर चढवली. ही रॅली एक शक्तीप्रदर्शन ठरली, ज्यामध्ये ठिकठिकाणी फुलांची उधळण केली गेली आणि फटाके फोडून रॅलीला स्वागत करण्यात आले. समर्थकांच्या गगनभेदी घोषणांनी वातावरणात जोश आणला होता.

या रॅलीने शहरात मोठा उत्साह निर्माण झाला आहे. कैलास पाटील यांची लोकप्रियता, त्यांच्याकडे असलेला जनसमर्थनाचा ओघ आणि प्रचंड जनसमुदाय हे त्यांच्या राजकीय अस्तित्वाची ताकद दर्शवतात. यंदा धाराशिव विधानसभा निवडणुकीसाठी पाटील यांचा हा दुसरा प्रयत्न असून, त्यांनी मतदारांमध्ये प्रचंड विश्वास आणि निष्ठा निर्माण केली आहे.

रॅलीच्या दरम्यान, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. त्यांच्या समर्थकांनी फुलांच्या उधळणीसह त्यांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आवाजाने शहर दुमदुमले होते. पाटील यांची ही शक्तीप्रदर्शन रॅली आणि धार्मिक स्थळांवर त्यांनी घेतलेले दर्शन हे निवडणुकीपूर्वीचा महत्वाचा धार्मिक आणि राजकीय संकेत मानला जात आहे.

 
Top